The Maratha News
राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पूर्णाकृती मूर्तीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते चार डिसेंबर 2023 रोजी भारतीय नौदल दिनाचे औचित्य साधून अनावरण करण्यात आले होते. वर्षभराच्या आतच छत्रपती शिवाजी महाराजांचे पूर्णाकृती स्मारक कोसळल्याने संपूर्ण देशभरामध्ये संताप व्यक्त केला जात आहे. माजी खासदार युवराज संभाजी राजे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना याआधी पत्रव्यवहार केल्याची आठवण केल्याची पोस्ट सोशल मीडियावर केली आहे.
मालवण नजीक असलेल्या राजकोट या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पूर्ण कृती मूर्तीचे अनावरण चार डिसेंबर 2023 रोजी भारतीय नौदल दिनाचे औचित्य साधून पंतप्रधान मोदींच्या हस्ते करण्यात आले होते.
तेव्हा युवराज संभाजीराजे यांनी आपण अनावरण केलेले शिल्प हे उत्तम शिल्पकलेच्या मानदंडात बसत नसल्याचे तसेच कित्येक आधुनिक साधने उपलब्ध असतानाही या शिल्पाची घडण प्रभावी आणि रेखीव दिसत नाही .मूर्तीचे हात पाय आणि चेहरा यामध्ये प्रमाणबद्धता दिसत नाही.
याबाबत एक पत्रव्यवहार नरेंद्र मोदी यांना 12 डिसेंबर 2023 रोजी केला होता त्याच सोबत त्यांनी शासनाच्या एखाद्या तज्ञ समितीने परिपूर्ण परीक्षण करून उत्तम शिल्पकलेचा नमुना म्हणून गणले जाईल असे छत्रपती शिवाजी महाराजांचे साजेसे नवे शिल्प या ठिकाणी लवकर प्रतिष्ठापित करावे अशी विनंती केली होती.
आज युवराज छत्रपती संभाजीराजे यांनी याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी, पंतप्रधान कार्यालय, राजनाथ सिंह यांच्यासह राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार,तसेच इतर प्रशासकीय घटकांना या संदर्भात सोशल मीडियावर टॅग करून पोस्ट केली आहे.