The Maratha News
महापालिकेत इमाने इतबारे नोकरी केल्यानंतर मानाने सेवानिवृत्त झालेल्या महापालिकेच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येत आहे. आधी मालमत्ता कराची एनओसी दाखवा आणि नंतर पेन्शन घ्या असा कार्यालयीन आदेश महापालिका आयुक्त शितल तेली उगले यांनी दोन जानेवारी रोजी काढला होता. त्यामुळे अनेकांची पेन्शन रक्कम अदा करण्यात आली नसल्याचा प्रकार समोर आला आहे. निवृत्तीवेतना विना कुटुंबियांची उपासमार होत असल्याचे पेन्शनधारक मंडळी सांगत आहेत.
महापालिका आयुक्तांच्या या आदेशामुळे वेतन मिळत नसल्याने या प्रकरणी थेट पंतप्रधान कार्यालय, मुख्यमंत्री कार्यालय आणि फायनान्स मिनिस्टर यांना पेन्शनधारक कुटुंबातील विशाल नालवार यांनी पत्रव्यवहार केला आहे. नियमाप्रमाणे थकबाकी रक्कम भरून सुद्धा पेन्शन मिळत नसल्याने अनेक जण नाराज आहेत.
याप्रकरणी पेन्शनधारक कुटुंबातील विशाल नालवार यांनी महापालिकेला माहितीच्या अधिकाऱ्याखाली माहिती मागितल्यानंतर अजूनही त्यांना माहिती मिळाली नाही असे त्यांचे म्हणणे आहे.
उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे पेन्शन हा जीवन जगण्यासाठीचा भाग आहे. असे नमूद केलेले आहे. तरीही आम्हाला पेन्शन मिळत नसल्याचे पेन्शन धारक महिलेने सांगितले.
दरम्यान,जोपर्यंत मालमत्ता कराची थकबाकी भरली जाणार नाही तोपर्यंत पेन्शन दिले जाऊ नये अशी सूचना मनपा आयुक्तांनी दिली असल्याने निवृत्तीवेतन अदा करण्यात आले नाही. त्यामुळे आम्ही महापालिकेत इतकी वर्ष सेवा केली परंतु असा वाईट अनुभव आला नाही अशी प्रतिक्रिया पेन्शन धारक व्यक्त करत आहेत.
विशाल नालवार यांनी या विरोधात केंद्र सरकारकडे सीपीईएनजी च्या माध्यमातून तक्रार दाखल केली आहे.