The Maratha news
सोलापुरात अवघ्या दोन दिवसात कर्जबाजारीपणाला कंटाळून दोघांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यातील पहिली व्यक्ती ही स्वतः सावकार होती. तर दुसरी व्यक्ती हे एका फर्ममध्ये मॅनेजर होती. आज बुधवारी सायंकाळी आत्महत्येची घटना उघडकीस आली आहे.
आज बुधवार दि. 19 जून रोजी राहत्या घरात हाताची नस कापून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नागेश देविदास गंगणे वय वर्षे 50 राहणार- खमितकर अपार्टमेंट, शेटे वस्ती रोड,सोलापूर असे या व्यक्तीचे नाव आहे.
नागेश गंगणे हे सोलापुरातील प्रसिद्ध अशा एका फर्ममध्ये मॅनेजर पदावर काम करत होते. खाजगी सावकारांकडून काढलेल्या कर्ज रकमेचा तगादा वाढल्याने त्यांनी आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी ,दोन मुले असा परिवार आहे.
हाताची नस चाकूने कापून नागेश यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय (सिव्हिल हॉस्पिटल) या ठिकाणी मृतदेह पंचनाम्यासाठी पाठवण्यात आल्याची माहिती निकटवर्तीयांनी दिली आहे.
उद्या गुरुवारी सकाळी शवविच्छेदन केल्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. पोलिसांनी राहत्या घरातील घटनास्थळाचा पंचनामा केलेला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
नागेश गंगणे यांच्या पाठीमागे सावकारांचा वसुलीचा तगादा लागल्यामुळे त्यांनी आत्महत्या केल्याची चर्चा पसरत आहे. या आधी सोमवारी शहरातील सावकारी व्यवसाय करणारे बाळे भागात राहणारे शरद जाधव यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. कर्जबाजारीपणाला कंटाळून त्यांनीही आपले जीवन संपवले होते अशी चर्चा परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर होत आहे.