The Maratha News
राज्यात पुन्हा एकदा मराठा आरक्षणावर वादळ निर्माण झाले आहे.मराठा आरक्षण जनजागृती रॅलीच्या दुसऱ्या टप्प्याची तयारी सुरु झालीय.पुणे, सोलापूर, अहिल्यानगर, नाशिक, सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांत दुसरा टप्पा होणार असून त्याबाबत मोठ्या प्रमाणावर तयारी सुरु झाली आहे. याच पार्श्वभूमीवर आज गुरुवारी अंतरवाली सराटी या ठिकाणी मराठा समाजाची नियोजन बैठक आयोजित करण्यात आलेली आहे.
पुणे ,सोलापूर ,अहिल्यानगर, नाशिक, सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व आयोजक, आंदोलक, उपोषणकर्ते व मराठासेवकांची महत्वाची बैठक मनोज जरांगे पाटील यांनी बोलावली आहे. या बैठकीत रॅलीच्या तारखा व इतर नियोजनासंदर्भात चर्चा होणार आहे.
लोकसभा निवडणूक निकालानंतर पुन्हा एकदा आरक्षण आंदोलन जोर धरत आहे. पहिल्या टप्प्यातील मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅलीस अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आहे. निवडणुकीच्या निकालानंतर जरांगे पाटील यांच्या आरक्षण आंदोलनाकडे मराठा समाज आकर्षित होणार नाही अशी चर्चा सुरू असतानाच जरांगे पाटलांच्या शांतता रॅलीस मिळणाऱ्या प्रतिसादामुळे संपूर्ण राजकीय वातावरण ढवळले गेले आहे.
राज्य सरकार मराठा आरक्षण बाबत सकारात्मक असल्याची माहिती मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी पत्रकार परिषदेत दिलेली आहे.
दरम्यान, सगे सोयरे आरक्षणाबाबत जरांगे पाटील आग्रही असून येत्या 20 तारखेला पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
आज 18 जुलै रोजी सकाळी दहा ते सायंकाळी 5 च्या दरम्यान अंतरवाली सराटी या ठिकाणी या सातही जिल्ह्यांची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे.
बैठकीची तारीखः१८ जुलै २०२४
वेळ: सकाळी १०:०० ते सायं ५:००
स्थळः अंतरवाली सराटी