The Maratha News
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा जागृती शांतता रॅलीला प्रचंड प्रतिसाद मिळत असून हिंगोली, परभणी नांदेड, लातूर, धाराशिव येथील रॅलीत लाखो समाज बांधव सहभागी होत असून त्यासोबत इतर समाजाचाही मोठ्या प्रमाणात सहभाग मिळत आहे. त्यामुळे आरक्षण आंदोलनाला वेगळी धार मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर मराठ्यांचा सरदार सोलापूरला येत असल्याची चर्चा मोठ्या प्रमाणावर सुरू झाली असून त्यासाठी तारीख निश्चित करण्यासाठी आज बुधवारी चारच्या दरम्यान धाराशिव येथे जाण्यासाठी सोलापूर शहर जिल्ह्यातील समन्वयक आणि प्रमुख मराठा नेते रवाना झाले आहेत.
मराठा आरक्षण आंदोलनामध्ये सोलापूर शहर जिल्हा हा हॉटस्पॉट ठरलेला होता.त्याची चुणूक लोकसभा निवडणुकीमध्ये प्रत्यक्षात पहावयास मिळाली. सोलापूर तसेच माढा लोकसभा मतदारसंघात मराठ्यांची मते ही निर्णायक ठरली.
दरम्यान, मराठा आरक्षण आंदोलनाची लढाई आता दुसऱ्या टप्प्यात आलेली असून मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला 13 जुलै ही अंतिम तारीख दिलेली आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील वातावरण ढवळले गेले असून राज्य सरकारने कालच सर्व पक्षांना मराठा आरक्षणाबाबत लेखी कळविण्यात सांगितलेले आहे.
सोलापुरातून तब्बल 2 हजार समन्वयक धाराशिवकडे..
मराठा जागृत शांतता रॅलीचा पुढील टप्पा हा सोलापूर पासून सुरू होणार असून त्यानिमित्त धाराशिव येथे विचार विनिमय करून तारीख ठरवण्यासाठी आज सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ, अक्कलकोट, पंढरपूर, माळशिरस,सोलापूर उत्तर,दक्षिण सोलापूर,माढा शहर येथून असंख्य समाज बांधव आजच्या बैठकीसाठी निघाले आहेत. मराठ्यांचा सरदार सोलापुरात येतोय त्यामुळे आरक्षण आंदोलन मोठ्या प्रमाणावर फोफावेल अशा प्रकारची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.