The Maratha News
सोलापूर शहराला अनुसरून बसचा आकार निर्धारित ; सोलापूर विकास मंचच्या मागणीला यश.
सोलापूर महानगरपालिकेची परिवहन व्यवस्था डबघाईला आलेली आहे.गेल्या दहा वर्षात त्याची परिस्थिती दिवसेंदिवस खालावत चाललेली आहे. 2014 साली जवळपास दीडशे बसेस आपल्याला JNNURM योजनेअंतर्गत केंद्र सरकारकडून मिळाल्या होत्या, त्या उण्यापुऱ्या तीन महिने सुद्धा रस्त्यावर चालल्या नाहीत.आज त्या सर्व बसेस भंगार अवस्थेत पडून आहेत. अशी परिस्थिती असतानाही सोलापूर विकास मंचने केलेल्या पाठपुराव्यामुळे सोलापूरकरांसाठी 70 मिनी ई बस मंजूर झाल्याची माहिती समोर आली आहे.
केंद्र सरकारच्या निवास व शहरी विकास आणि पेट्रोलियम व नैसर्गिक गॅस मंत्रालय ministry of housing and urban affair petroleum and natural gas मार्फत पंतप्रधान ई बस PM E bus योजनेअंतर्गत सोलापूर शहराला नोव्हेंबर 23 मध्ये 100 इ बसेस मंजूर झाल्या होत्या.
सोलापूर विकास मंचने सोलापूर शहरातील रस्त्यांची रुंदी, सलग सरळ रस्त्यांची लांबी, टर्निंग रेडियस, वळणं या सर्वांचा बारकाईने अभ्यास करून सोलापूर महानगरपालिकेचे शहर अभियंता, पालकमंत्री, महाराष्ट्र राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री व डायरेक्ट पंतप्रधान कार्यालय यांच्याशी पत्रव्यवहार करून सोलापूर शहरात लांबलचक ई-बस चालणार नाहीत, त्या ऐवजी मिडीबस उपयुक्त आहेत, अशी अभ्यासपूर्ण मांडणी केल्यानंतर central sanctioning and steering committee यांनी खास सोलापूर साठी 70 मिनी बस मंजूर केल्या व 30 नियमित आकाराच्या मोठ्या बसेस मंजूर केल्या.
या 70 बसेस सोलापूर शहरात सहजगत्या फिरू शकतात ,वळू शकतात, आणि प्रवाशांना याचा चांगल्या पद्धतीने लाभ घेता येईल.
केंद्र सरकारकडून तशा आशयाचे पत्र महानगरपालिकेला प्राप्त झाले आहे आणि महानगरपालिका परिवहन विभागाने सोलापूर विकास मंचलावरील माहिती पत्राद्वारे कळवली आहे. यासाठी मिलिंद भोसले यांनी पाठपुरावा केला होता. महापालिकेच्या परिवहन उपक्रमाचे कार्यालयीन अधीक्षक यांनी जिल्हा नियोजन विभाग यांना वरील माहिती कळवली आहे.