The Maratha News
अंतरवाली सराटी या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी तसेच इतर मागण्यासाठी उपोषण सुरू केल्याने त्यांच्या समर्थनार्थ आज पुणे बंदची हाक मराठा समाजाने दिली आहे. अनेक जिल्ह्यातून मराठा आरक्षण आंदोलनाला मोठा पाठिंबा दिला जात आहे.
आज संभाजीनगर मध्ये मराठा बांधवांचे रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.जालना,परभणी मध्ये आज मराठा समाजाकडून बंदची हाक देण्यात आली आहे. मराठा- ओबीसी समाजामध्ये कोणत्याही प्रकारची तेढ निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे.
मराठा समाज बांधवांकडून आज पुणे बंदची हाक दिली असून राज्यात अनेक ठिकाणी मराठा आरक्षणासाठी तसेच मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ अन्नत्याग, आत्मक्लेष, धरणे आंदोलन केली जात आहे.
नवी मुंबईतील मराठा आंदोलक हे आक्रमक झाले असून बीड, धाराशिव, परभणी,पुणे, मुंबई नंतर नवी मुंबईतील आंदोलकही आक्रमक झाले आहेत.
नवी मुंबईत सुद्धा अन्नत्याग उपोषण केले जाणार आहे.
दरम्यान,सगेसोयरे अधिसूचनेबाबत शासनाकडून फसवणूक झाली या भावनेतून आंदोलन केले जाणार असल्याचे जाहीर केले जात आहे.
जालना मध्ये काही ठिकाणी आंदोलन केले गेले असून २४ सप्टेंबर रोजी मंगळवारी वसमत तालुका कडकडीत बंदची हाक मराठा समाजाकडून देण्यात आली आहे.
सकल मराठा समाज वसमत तालुक्याच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी तहसील कार्यालय वसमत या ठिकाणी मोर्चा काढण्यात आला त्यानंतर तहसीलदारांना निवेदन देण्यात आले होते.
पंढरपूर तसेच मंगळवेढ्यातही धरणे आणि उपोषण आंदोलन केले जात आहे.
बार्शी मध्ये आनंद काशीद हे जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ तसेच मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आमरण उपोषणाला बसले आहेत. त्यांनीही उपचार घेण्यास नकार दिला होता. अखेरीस अंतरवाली सराटीतून संदेश आल्यानंतर त्यांनी सलाईन लावून घेतले आहे.
विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठा आंदोलन चिघळले असून यावर ताबडतोब तोडगा काढावा अशी मागणी जोर धरत आहे.
पोलीस प्रशासन कोणतेही दोन समाज समोर येऊन तणावाची परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी प्रयत्न करत आहेत.