The Maratha News
प्रभाग पाच मधील बाळे परिसरातील लक्ष्मी नगर भागामध्ये गेल्या दहा ते बारा वर्षांपासून पिण्याच्या पाण्याच्या पुरवठा अत्यंत कमी दाबाने होत असतो. तिथे प्रत्येक घरामध्ये इलेक्ट्रिक मोटर लावून सुद्धा पाणी येत नसल्याने नागरिकांना आर्थिक भुर्दंड सोसून देखील पाणी पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नसल्याची तक्रार करून या संदर्भातील मागणीचे निवेदन बाळे भागातील भाजपच्या नेतेमंडळींनी महापालिका प्रशासनाला आज सोमवारी दिले. बाळे भाग हा माजी पालकमंत्री तथा आमदार विजयकुमार देशमुख यांचा बालेकिल्ला मानला जातो.
पिण्याच्या पाण्याबद्दलच्या समस्या येथील नागरिकांनी प्रभागातील भाजपचे नेते राजाभाऊ आलुरे यांच्याकडे मांडल्या होत्या.त्यावर त्यांनी तातडीने लक्ष घालून शिष्टमंडळासह पाणीपुरवठा मुख्य अधिकार्याची भेट घेतली.
दरम्यान,लक्ष्मी नगर येथे पुण्याला जाणारी पाईपलाईन ही बाळे पोलीस चौकीच्या बाजूच्या पुलाखालील वैष्णवी हाईटच्या बाजूने चंडक शाळेच्या चढावरून येत असल्याने पाण्याचा दाब कमी येतो,ही वस्तुस्थिती भाजपच्या वतीने महापालिका प्रशासनासमोर मांडण्यात आली.

बाळे येथील चौकातून ब्रीज खालून पिण्याची पाईपलाईन टाकल्यास सदरचा होणारा पाण्याचा त्रास कायमस्वरूपी कमी होईल. अशा स्वरूपाचे निवेदन यावेळी भाजपाच्या वतीने देण्यात आले.
मनपा प्रशासनाने तातडीने लक्ष घालून पिण्याच्या पाईपलाईन संबंधित अधिकाऱ्यांना सांगून बदलून देऊन येथील नागरिकांना सहकार्य करावे या मागणीचे पत्र सोलापूर शहराचे पाणीपुरवठा अधिकारी व्यंकटेश चौबे यांना देण्यात आले. यावेळी प्रभागातील भाजप नेते राजाभाऊ आलूरे, आनंद भवर, रतन क्षीरसागर, नंदकुमार बटाने आदी उपस्थित होते.