The Maratha News
मराठा समाजाला आरक्षण, सगेसोयरे व गॅझेटच्या अंमलबजावणीसाठी सरकारने १३ जुलैपर्यंतची वेळ मागून घेतली होती. परंतु सरकारने याही वेळी मराठ्यांची फसवणूक केली असून कोणताच निर्णय घेतला नाही त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू करणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यानुसार आज पासून अंतरवाली सराटी या ठिकाणी सकाळी दहा पासून जरांगे पाटील उपोषणासाठी बसणार आहेत.
प्रकृती साथ देत नसल्यामुळे उपोषणा ऐवजी दुसरा मार्ग निवडावा अशी विनंती जरांगे पाटील यांना मराठा समाजाच्या बैठकीत वारंवार करण्यात आली होती.
परंतु सरकार मराठा बांधवांवर गुन्हे दाखल करीत आहे. कोणत्याच मागण्या मान्य करत नाही. त्यामुळे लोकशाही मार्गाने उपोषण करण्याचा निर्णय जरांगे पाटील यांनी घेतला आहे.
आज सकाळी दहा पासून अंतरवाली सराटी या ठिकाणी ते आमरण उपोषणासाठी बसणार आहेत. गरजवंत मराठ्याच्या शेवटच्या लेकराला न्याय भेटेपर्यंत माझा जीव गेला तरी एक इंच मागे हटणार नाही असा निर्धार पाटील यांनी केला आहे.
मराठा जागृती शांतता रॅलीच्या तारखा निश्चित झाल्या असून मी जर जिवंत राहिलो तर या रॅलीला नक्की उपस्थित राहील अन्यथा ॲम्बुलन्स मधून रॅली सुरू केली जाईल असे त्यांनी नियोजन बैठकीत सांगितले होते.