The Maratha News
संपूर्ण राज्यात जरांगे पाटील पॅटर्न मोठ्या प्रमाणावर गाजला याची प्रचिती लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर सत्ताधारी आणि विरोधी पक्षाला आली. मराठा आरक्षण आंदोलनात प्रमुख भूमिका बजावणारे मनोज जरांगे पाटील आज दिनांक 8 जून पासून पुन्हा एकदा अंतरावली सराटी या ठिकाणी आमरण उपोषण करणार आहेत. या उपोषणाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे तरी पाटील हे उपोषणावर ठाम आहेत.
सगे सोयऱ्यांचे आरक्षण मिळावे या मागणीवर जरांगे पाटील आक्रमक पद्धतीने आपली भूमिका मांडताना दिसत आहेत. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता असल्यामुळे उपोषणाला परवानगी नाकारली होती अशी माहिती पाटील यांनीच प्रसारमाध्यमांना दिली होती. 4 जून रोजी लोकसभा निवडणूक निकालाच्या दिवशी ते उपोषण करणार होते परंतु आचारसंहितेमुळे मी उपोषण स्थगित करत असल्याचे त्यांनी सांगितले होते.
दरम्यान, आज शनिवार 8 जून पासून अंतरावली सराटी या ठिकाणी ते आमरण उपोषणासाठी बसणार आहेत. त्यांच्या भेटीसाठी राज्यातून मराठा समाज पाठिंबा देण्यासाठी दाखल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या ठिकाणी पोलिसांचा मोठा फौजफाटा असून सुव्यवस्थेला धक्का लागू नये यासाठी प्रशासन सतर्क असल्याचे दिसून येत आहे.