The Maratha News
मी जन्माला येताना कोणत्या पक्षाचा म्हणून आलो नाही, तर मराठा म्हणून जन्माला आलोय. समाजासाठी कोणत्याही प्रकारचा त्याग करण्याची माझी तयारी असून कोणाला काही अडचण असल्यास मी सर्वात पुढे असेन असा शब्द मोहोळ मध्ये ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांनी दिला. मराठा समाजाच्या शांतता रॅली नियोजन बैठकीत ते बोलत होते.
सात ऑगस्ट रोजी मराठा आरक्षण आंदोलनात प्रभावी भूमिका बजावणारे नेते मनोज जरांगे हे सोलापूर दौऱ्यावर येत आहेत. मराठा जागृती शांतता रॅली मोठ्या संख्येने निघण्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने तालुका निहाय नियोजन बैठका घेतल्या जात आहेत. मोहोळ तालुक्यातील बैठकी प्रसंगी सहभागी झालेल्या समाज बांधवांसमोर त्यांनी भावना व्यक्त केल्या.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. मंचावर सकल मराठा समाजाचे नेते माऊली पवार, प्रा. गणेश देशमुख, शिवाजी चापले, माजी नगरसेवक विनोद भोसले आदी उपस्थित होते.
यावेळी डॉ. प्रमोद पाटील यांनी प्रास्ताविक केले. समन्वयक माऊली पवार यांनी आरक्षण आंदोलना संदर्भात लढा हा अंतिम टप्प्यात असून सर्वांनी साथ देण्याचे आवाहन केले.प्रा. गणेश देशमुख यांनी सात ऑगस्ट च्या नियोजनाची सविस्तर माहिती दिली. शिवाजी चापले यांनी आरक्षण आंदोलनाची गरज याविषयी भाष्य केले. महेश पवार या मराठा आंदोलकाने नेहमीच्या शैलीत ग्रामीण भाषेत भाषण करून उपस्थितांची मने जिंकली. सूत्रसंचालन ॲड.श्रीरंग लाळे यांनी केले.
शांतता रॅली नियोजन बैठकीसाठी तालुक्यातील समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता. यावेळी समाज बांधवांनी नियोजना संदर्भात आपापली मते व्यक्त केली.