The Maratha News
राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांना दिलेल्या आश्वासनाची मुदत संपलेली असून जरांगे पाटील यांनी आक्रमक पद्धतीने बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत आणि इतर शिष्टमंडळावर तोफ डागली. त्यानंतर लागलीच राजेंद्र राऊत हे अंतरावली सराटी या ठिकाणी जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी दाखल झाले. चर्चेनंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.त्यावेळी ते म्हणाले की..
मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण संपवण्यासाठी शिष्टाई करणाऱ्या प्रमुख राजकीय नेत्यांमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय समजले जाणारे आमदार राजेंद्र राऊत यांनी पुढाकार घेतला होता. मंत्री शंभूराजे देसाई, खासदार संदिपान भुमरे, राणा जगजितसिंह निंबाळकर यांच्या शिष्टमंडळाने अंतरवाली सराटी या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन मागण्या मान्य केल्या जातील, आपण उपोषण सोडावे अशी मागणी केली होती. यावर त्या विनंतीला मान देऊन जरांगे पाटील यांनी उपोषण स्थगित केले.

13 जुलैचा जरांगे पाटलांचा अल्टीमेटम संपला असून 20 जुलै पासून पुन्हा एकदा आमरण उपोषण करण्याचा निर्णय जाहीर केला. आणि त्यानंतर पुन्हा राजकीय वातावरण तप्त झाले.
राज्य सरकारला दिलेल्या मुदतीत मागण्या मान्य झाल्या नसल्याने जरांगे पाटील यांनी एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांच्यावर कठोर टीका केली.
तरीही आज गुरुवारी सकाळी आमदार राजेंद्र राऊत हे अंतरवाली सराटी या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी आले. जवळपास एक तासाहून अधिक काळ झालेल्या चर्चेनंतर आमदार राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
मी मराठा समाजाचा कट्टर लढवय्या कार्यकर्ता आहे. एखादा दुसरा असला असता तर टीकेला घाबरून समोर आला नसता पण मी प्रकृती ठीक नसतानाही भेटायला आलोय.उपमुख्यमंत्री फडणवीस हे मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक असून लवकरच योग्य तो निर्णय घेतला जाईल. आणि त्या संदर्भात निरोप देण्यासाठी मी जरांगे पाटलांकडे आलो होतो. असे त्यांनी सांगितले.
थोडक्यात..!
आजच मनोज जरांगे पाटील यांनी दुसऱ्या टप्प्यातील मराठा जागृती शांतता रॅली संदर्भात बैठकीचे आयोजन केलेले आहे. यामध्ये सात जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे.



पुणे, सोलापूर, अहिल्यानगर, नाशिक, सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांत दुसरा टप्पा होणार असून त्याबाबत मोठ्या प्रमाणावर तयारी सुरु झाली आहे. याच पार्श्वभूमीवर आज गुरुवारी अंतरवाली सराटी या ठिकाणी मराठा समाजाची नियोजन बैठक आयोजित करण्यात आलेली आहे.